कोरोना आणि सामाजिक मानसिकता ....( कोरोना : शारीरिक आजार की अपराध ? )
लोक घरातून बाहेर पडायला घाबरत आहेत तर आम्ही घरी जायला.घरी जाऊन आपण कुटुंबाला संसर्गाच्या खाईत तर ढकलणार नाही ना, ही भीती. सध्या कोरोनात एचआर सीटी स्कॅन ला अनन्यसाधारण महत्व आहे. रेडीओलॉजिस्ट डॉक्टर नात्याने कोविड रुग्णांची सीटी स्कॅन करण्यानिमित्ताने दररोज त्यांच्या उपचारात योगदान देण्याचे भाग्य लाभत आहे. डॉक्टरांचा कोरोना रुग्णांशी प्रत्यक्ष संबंध येत असल्याकारणाने संसर्गाचा धोका कैकपटीने वाढतो. कोरोनाने डॉक्टरांच्या मृत्यूची टक्केवारी इतर लोकांच्या तुलनेत जास्त आहे कारण त्यांना संसर्गावेळी मिळणारा व्हायरल लोड जास्त असतो. तरी सगळा धोका पत्करून फक्त डॉक्टर्सच नाही तर इतर कोविड योद्धेही आपल्या कर्तव्यापासून तसूभरही हटलेले नाहीत आणि याची पूर्ण जाणीव असल्याच्या कृतज्ञभावनेचे दर्शन देशवासीयांनी वेळोवेळी दिले आहे. परंतु दररोज रुग्ण व नातेवाईकांच्या संपर्कात राहून काही अनुभव आल्याने कोरोना आणि बदललेली सामाजिक मानसिकता यावर मंथन करणे प्रासंगिक ठरते.
एक गोष्ट ज्यावर प्रसारमाध्यमांनी पुरेशी चर्चा घडवून आणायला पाहिजे होती ती म्हणजे कोरोनाने काही जणांची काही प्रमाणात माणुसकी संपविली. कदाचित माध्यमांना नटांची आत्महत्या, निव्वळ करमणुकीचे ट्विटरयुद्ध यांचा व्याप जास्त असेल. असो. परवा एक अनुभव आला. आमच्या कोविड सेंटरमध्ये भरती असलेल्या गर्भवती महिलेजवळ चार्जर नसल्याने मी तिला सुचविले की कुणाला तरी बाहेर सुरक्षारक्षकाजवळ चार्जर आणून द्यायला सांगा, आम्ही तो आतमध्ये तुमच्यापर्यंत पोहचवू. तर तिने, “ साहेब, मी पॉजीटीव्ह आल्यापासून घरचे सगळे होम क्वोरंटाईन आणि आमच्या घरच्यानाच गावात कुणी बोलायला तयार नाहीत तर मला इथे कोण चार्जर आणून देईल ?” अशा शब्दांत व्यथा मांडली. काहींनी तर मला कोरोना रुग्णाशी फोनवर बोलल्याने काही धोका आहे का असेही विचारले. म्हणजे कोरोनाच्या ६ महिन्यानंतरही पुरेशी जनजागृती तर नाहीच उलट कोरोना बाधीताला हा समाज गुन्हेगार ठरवायलाही मागेपुढे पाहत नाहीत. त्याअनुषंगाने कोरोना व्हायरसच्या कार्यपद्धतीला दोन अंगांत विभागावे लागेल. एक म्हणजे शरीरावर हल्ला करणे आणि दुसरे म्हणजे सामाजिक नातेसंबंधांवर हल्ला करणे. एखाद्या आजाराने फक्त शरीरच खाल्ले तरीही मान्य, ते त्याचं कामच आहे. परंतु एखाद्या व्हायरसची एवढी लायकी की संस्कृती आणि माणुसकीचा उदोउदो करणाऱ्या भारतीय लोकांच्या मनांमध्ये दुरावा निर्माण करेल. जरी सद्यपरिस्थितीत एप्रिल-मे च्या तुलनेत कोरोना रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना समाजाकडून वाळीत टाकण्याचे प्रमाण बरेच कमी झालेले असले तरी ते संपलेले नाही. एखाद्याला कोरोन झाला की त्याच्याबद्दलची समाजाची मानसिकता लगेच बदलते, कुजबुज सुरु होते. रुग्ण भरती झाल्यावर तो जेवढा व्हायरसचा विचार करतो त्याहीपेक्षा जास्त बाहेरील जगात आपल्याविषयी काय काय चर्चांना उधाण येत असेल या विचारांनी व्यथित होतो. एखाद्याचा कोरोना बरा झाल्यावरही त्याच्याशी संपर्क ठेवण्यास भिणे म्हणजे घटस्फोट झाल्यावरही पूर्वपत्नीला घाबरण्यासारखे आहे. पूर्वीच्या काळातील कुष्ठरोग, क्षयरोग, एड्स याबाबतीतली बहिष्कार व अस्पृश्यतेची भावना कोरोनाबाबत येऊ लागली हीच लिखाणामागची उद्विग्नता.
या सगळ्या विवंचनेत अडकण्याच्या भीतीपोटीच लक्षणं असलेली लोकही तपासणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. कारण एकच की टेस्ट पॉजिटीव्ह आली तर सगळंच अवघड ही भीती. त्यामुळे ती लोकं टेस्ट न करता समाजातच राहून नकळतपणे संसर्ग पसरवत राहतात आणि वरून हीच मंडळी भारतातील कोरोना झपाट्याने वाढण्याची कारणे यावरील चर्चासत्रात मतं ठोकायला मोकळी.
माझ्याजवळ एका महाशयांनी तर त्यांचे अमुल्य मत आणि हटके युक्तिवाद असा केला की, “कोरोना नावाची गोष्टच अस्तित्वात नसून हा भीती दाखवून पैसे उकळण्याचा धंदा आहे कारण जर कोरोनाची लसच अजून तयार झाली नाही तर रुग्ण बरे कसे होतायेत?” मला हसावे की रडावे कळेना. अरे बाबा, लस ही प्रतिबंधात्मक गोष्ट असून ती कोरोना होऊ नये यासाठी उपयोगाची आहे, ना की कोरोना झाल्यावर रुग्ण बरा करण्याची. कोरोना झाल्यावर उपयोगी येते ती प्रतिकारशक्ती आणि प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधांचा उपचारात समावेश होतो. जोपर्यंत आपल्या घरातील व्यक्ती कोरोनाने दगावत नाही तोपर्यंत आपल्याला कोरोना थोतांड वाटतो ही भारताची शोकांतिका आहे.
वातावरणात असंख्य व्हायरस आहेत जे आपल्याला बाधित करतात, त्यातीलच एक कोरोना. इतर व्हायरल संसर्गाप्रमाणेच कोरोनातही काही गुंतागुंतींमुळे काही मृत्यूही होतात परंतु त्याला जीवघेणा म्हणता येणार नाही. म्हणून इतर व्हायारसप्रमाने कोरोनालाही येऊ द्या ना, आपण त्यालाही परतावून लाऊ. कोरोना म्हणजे यापलीकडे काहीही नाही. एवढेच की कोरोनाचा संसर्ग इतर व्हायरसपेक्षा लवकर व सहजगत्या होतो. त्यासाठी आपण उत्तम प्रतिबंधात्मक काळजी घेऊया. तसेच आम्ही शेतात राबून घाम गाळणारे, आम्हाला कोरोन होणे अशक्यच या भ्रमात राहूनही चालणार नाही कारण कोरोना आजही त्याचे काम नेटाने करतो आहे म्हणून आपल्यालाही कोरोनाला सहजतेने न घेता सजग रहावेच लागेल.
तात्पर्य हेच की कोविड केंद्रात भरती किंवा होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांशी व त्यांच्या कुटुंबियांशी सहिष्णुतेने वागणे, जवळीकता (फक्त मनाने) दाखविणे, अडीअडचणीच्या प्रसंगी स्वतःची काळजी घेऊन मदतीला धावणे, फोनवर संपर्कात राहणे, हिम्मत देणे या गोष्टी रुग्णाला त्याच्या शरीरातून कोरोनाला परतावून लावण्यासाठी बऱ्याच अंशी मदत करतात. कोरोना बाधितांना सामाजिक असुरक्षिततेच्या भावनेपासून दूर ठेवणे हे समाजाचेच कर्तव्य आहे. त्यासाठी इथल्या बुद्धीजीवी व सुशिक्षित वर्गाने जनजागृती करणे आवश्यक ठरते. कारण कोरोना हा निव्वळ शारीरिक आजार असून कुणाला कोरोना होणे हा त्याचा अपराध नव्हे.
डॉ.सत्यजित शिवलिंगराव इबितेएम बी बी एस, डी एम आर ई satya.ibite@gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा